अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते.
चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे.
दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जो काही ठिकाणी खटकतो. दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी जोतीबांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आणि त्या सशक्त झाल्या हे सत्य असले तरी, चित्रपटात त्यांचे स्थान जोतीबांच्या पुढे दाखवणे काहीसे अतिशयोक्त वाटते. नाभिकांच्या संपासारख्या महत्त्वपूर्ण घटनांमध्ये सावित्रीबाईंचा मोठा सहभाग दाखवणे किंवा दलित वस्तीत विहीर बांधण्याचा निर्णय त्यांनी घेणे हे ऐतिहासिक तथ्यांशी जुळणारे नाही. काही ठिकाणी तर सावित्रीबाईंचा आवाज जोतीबांपेक्षा मोठा आणि प्रभावी वाटतो, जे त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीत थोडे लाऊड वाटते. विशेषतः कंत्राटाच्या लोभापायी जोतीबा धर्मांतर करतील या भीतीने सावित्रीबाईंनी घरात विहीर बांधण्याचा निर्णय घेणे हा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन संभ्रम निर्माण करणारा आहे.
फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला चित्रपटात दिलेले महत्त्व स्वागतार्ह असले तरी, त्यांची भूमिका सावित्रीबाईंपेक्षा प्रभावी दाखवणे आणि त्यांचे इंग्रजी भाषेतील प्रभुत्व तसेच मुस्लिम धर्मगुरूंशी असलेले त्यांचे वाद ऐतिहासिक तथ्यांवर आधारित आहेत का, याबद्दल शंका आहे.
याव्यतिरिक्त, चित्रपटात जोतीबांच्या कार्यामागे इंग्रजांची मदत आणि प्रेरणा असल्याचे वारंवार दाखवले जाते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रगती आणि कंत्राटदार म्हणून मिळालेल्या यशामध्ये इंग्रजांचा मोठा वाटा होता, असे चित्र उभे केले जाते. कंत्राट मिळवण्यासाठी जोतीबांना इंग्रजांचे ऐकावे लागत होते, असा गर्भितार्थ काही दृश्यांतून दिसतो. महात्मा फुलेंना त्यांच्या कार्यासाठी समविचारी लोकांची मदत मिळाली हे सत्य असले तरी, त्यांच्या कार्याला आणि विचारांना केवळ बाह्य मदतीवर अवलंबून दाखवणे हे त्यांचे महत्त्व कमी लेखण्यासारखे आहे.
चित्रपटातील अनेक प्रसंग आणि संवाद जोतीबा फुलेंच्या धाडसी आणि कणखर प्रतिमेला सादर करण्यात कमी पडतात. ‘गुलामगिरी’ या ग्रंथाचे लेखन सावित्रीबाईंच्या सांगण्यावरून झाले हे पटण्यासारखे नाही. तसेच, चित्रपटात जोतीबांच्या कार्याची व्याप्ती आणि त्यांच्या समकालीन समाजसुधारकांचा कोणताही उल्लेख नाही, ज्यामुळे त्यांचे कार्य एका विशिष्ट चौकटीत बांधल्यासारखे वाटते.
एकंदरीत, ‘फुले’ हा चित्रपट महात्मा जोतीराव फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे योग्य प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरतो. दिग्दर्शकाने एका युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न केला आहे की काय, असा प्रश्न पडतो. मराठी मध्ये निलेश जळमकर यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट सत्यशोधक आणि फुले या चित्रपटांमधील जोतीबांच्या चित्रणात मोठा फरक जाणवतो, ज्यामुळे प्रेक्षक वर्ग संभ्रमात पडू शकतो. सेन्सॉर बोर्डाच्या बदलांपेक्षा चित्रपटातील हे चित्रण अधिक गंभीर आहे आणि त्यामुळे महात्मा फुल्यांच्या कार्याचा योग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचत नाही. कविता मुरूमकर यांची ‘मी सावित्री जोतीराव’ ही कादंबरी या चित्रपटापेक्षा अधिक प्रभावीपणे फुल्यांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय करून देते. तुर्तास एवढेच..! मनापासून धन्यवाद.! #जयज्योती #जयक्रांती #जयमहाराष्ट्र
© अजय मारोतराव भुजबळ
(लेखक लिहितो - पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा