पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी महत्त्वाचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे भारतीय संविधानातील कलम ५१(अ) नुसार प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
दांडेकर पूलजवळील साने गुरुजी स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले की, केवळ श्वास घेणे म्हणजे जगण्याचा अधिकार नाही. माणूस म्हणून सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रदूषण, सामाजिक अंधश्रद्धा यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच मदत करू शकतो.
यावेळी न्यायमूर्ती हेमंत गोखले म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे धर्माला धक्का लागत नाही. उलट, तो मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची, तर्क लावण्याची आणि सत्याचा शोध घेण्याची ही एक मानसिक सवय आहे."
या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर यांच्या विचारांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. डॉ. दाभोलकर यांनी आपलं आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेचलं. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अधिकच गरज आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा