सावध ऐका पुढल्या हाका..!
{-सदरील लिखाण आर्टिकल इरफान शेख यांनी लिहिलेला आहे ते फारच मनाला भावलं म्हणून ब्लॉगला प्रसिद्ध करत आहे.-}
(टीप:- मी ना कुठल्या पक्षाचा भक्त आहे, ना गुलाम आहे, ना शिवसैनिक आहे, ना मनसैनिक आहे आणि ना कुठल्या दादा- साहेबांचा कार्यकर्ता आहे.)
या भारतातील एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जे दिसतंय त्यावर माझ्या भावना व्यक्त करतोय फक्त.
काय सुरू आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात?
कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे ही सध्याची राजकिय परिस्थिती?
कुठलं हिंदुत्व तुम्हाला अपेक्षित आहे ? ते हिंदुत्व साध्य करण्यासाठी कुठली निकषं तुम्ही लावणार आहात?
नवनीत राणांनी अमरावतीत केलेली नाटकं, त्यानंतर तोंडावर पडल्यानंतरही दिशाभूल करत स्वतःच्याच मुद्द्यांचं अर्थहीन समर्थन, निलेश राणेंचं डोळे काढण्याचं वक्तव्य, काल आमदार सदा सरवणकर यांनी केलेलं वक्तव्य, ‛हिंदूंच्या सणात हिंदूंमधेच होणारे भांडण’ किंवा मग राहुल गांधी, केजरीवाल यांना कुठलं हिंदूंचं राज्य आणायचं आहे? त्यांच्या हिंदू राज्याची नेमकी व्याख्या काय?
अचानक या सगळ्यांच्या भावना उफाळून का येत आहेत?
‛हिंदुत्वासाठी आम्ही सरकार स्थापन केलं, हे सरकार हिंदुत्ववादी आहे’ असं यांचं म्हणणं आहे. मग हिंदुत्ववादी सरकार मध्ये हिंदूंकडे बघायची कुणाची हिम्मत होणार आहे? तुमचं ‛हिंदुत्व खतरे में’ कुणामुळे येणार आहे?
आमदार, खासदार, नेते मंडळी तुमचं हिंदुत्व अडचणीत आणणार आहेत की आमच्यासारखी सर्वसामान्य जनता?
नेतेमंडळी जर तुमचं उत्तर असेल तर मग *अब्दुल सत्तार हिंदुत्वाच्या लढाईत हातात झेंडे घेऊन तुमचं प्रतिनिधित्व करणार आहेत का?, हिंदुत्वासाठी सरकारला पाठिंबा देणारे आणि मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणारे संजय शिरसाठ, बच्चू कडू हिंदुत्वाच्या लढाईत तितक्याच ताकतीने मैदानात उतरणार आहेत का? किंवा मग इम्तियाज जलील, अस्लम शेख, अबू आझमी सारखी माणसं धर्माचं संरक्षण करण्यासाठी स्वतः झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत का?
मुळात तुम्हाला अडचण नेतेमंडळींची नाहीयेच.
तुम्हाला आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेच्या हातात हिंदुत्वाची लढाई लढण्यासाठी झेंडे द्यायचे आहेत आणि तुमच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी *आग जोरदार लागावी यासाठी इंधन म्हणून आम्हाला चुलीत टाकायचं आहे.
कारण तुमच्या लेखी हिंदुत्वाचे पाईकही आम्हीच आहोत अन हिंदुत्वाला धोकाही आमच्याकडूनच आहे.
बरं, मी रोज हिंदू मित्रांसोबत असताना, ते माझ्यासोबत असताना, मला माझ्याकडून त्यांच्या हिंदुत्वाला धक्का लागताना किंवा त्यांच्याकडून ‛इस्लाम खतरे में हैं’ ची जाणीव मला कधीच आली नाही आणि ती येणं ही शक्य नाही.
कारण आम्हा सगळ्यांना आमच्या धर्माबद्दल प्रेम आहे पण एकमेकांच्या धर्माबद्दल अजिबातच तिरस्कार नाहीये.
मग तुम्ही नेतेमंडळी आमच्या धर्माचे ठेकेदार होणार आहेत का? तुम्हाला धर्माचे प्रतिनिधित्व करण्याची प्रमाणपत्रे कुणी दिली आहेत?
धर्माच्या नावावर स्वतःचा वर्चस्ववाद प्रस्थापित करताना लागलेल्या आगीत तुमची मुलं कुठेच नसणार आहेत. रस्त्यावर रक्तपात हा सामान्य लोकांचाच होणार आहे ज्यांना हेही माहित नसेल की ‛धर्म’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? धर्माची मूलतत्त्वे काय? धर्माचा सार काय? केवळ तुम्ही पेटवलेल्या वातावरणात ती होरपळून निघणार आहेत.
हा धार्मिक ध्रुवीकरणाचा अट्टहास का? राजकीय ईप्सित साध्य करण्यासाठी कुठलीही पातळी गाठणार आहात का? होणाऱ्या परिणामांची जाणीव नाहीये का तुम्हाला?
अशा वातावरणात मला भक्त, गुलाम, सैनिक, सेनापती, वाघ, बिबटे, कोल्हे, कावळे, चिमणे, कार्यकर्ते या सगळ्या स्वयंघोषित वारसदारांना सांगायचं की धार्मिक ध्रुवीकरण करून स्वतःच्या गरजा भागवणार्या कुठल्याही मतलबी नेत्यांच्या भानगडीत पडू नका. कारण आपल्या गरजा ह्या मर्यादित आहेत आणि आपल्याला अडीअडचणीत आपलेच गावातील कुणीतरी *राम भाऊ, रहीम भाई, आण्णा, तात्या, मामु, काका, चाचा कामी येणार आहेत. ना की कुणी राजकीय दादा, साहेब, नेते, गळ्यातले ताईत, काळीज, फुप्पूस, यकृत वगैरे वगैरे..
ते रंगवून सांगत असलेले श्रीराम, अल्लाह, येशू हे वेगळे आहेत आणि आपले original श्रीराम, अल्लाह, येशू हे फार वेगळे आहेत.
त्यांनी रंगवलेल्या देवांवर विश्वास ठेवू नका, आपल्या मनातल्या देवांवर विश्वास ठेवा.
शेवटी किरणकुमार मडावी म्हणतात तसं,
‛आकाश भेदनारा पल्ला लहान नाही, या सूर्यपाखरांचा कल्ला लहान नाही..
हृदयात रामरक्षा असू दे तू तुझ्याही,
पण लक्षात तू असू दे अल्लाह लहान नाही..’
या ओळी लक्षात ठेवल्या तर उद्भवणारे बरेच प्रश्न सुटतील आणि राजकिय मंडळी निर्माण करत असलेले वातावरण आपल्यामुळे गढूळ होणार नाही.
ते न होऊ देणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
ती आपण पेलूयात आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे चालूयात..
धन्यवाद..🙏🏻🙏🏻
✒️ शेख इरफान इकबाल. (औरंगाबाद)
मो. 8806814363.
(सदरील लिखाण लेखकाचं वैयक्तिक अनुभव कथन आणि आकलन आहे प्रकाशित करणारे ब्लॉगचे मालक या विचाराशी सहमत असतील असं नाही सर्व अधिकार लेखकाच्या आधीन आहेत लेखक इरफान शेख औरंगाबाद,)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा