मुख्य सामग्रीवर वगळा

भारताच्या पोटात पाकिस्तान न बनण्याची गोष्ट.....

भारताच्या पोटात पाकिस्तान न बनण्याची गोष्ट... 

'मेरी सल्तनत अब खत्म हो चुकी हैं, हथियार डाल दो...!'
                   
                     - लेखक : अजिंक्य गुठे सालेगांवकर

17 सप्टेंबर 1948 च्या दिवशी हैदराबादच्या रेडिओवरून सातवा निझाम मीर उस्मान अली खाननं ही घोषणा केली. भारत देशात हैदराबाद संस्थान विलीन झालं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने हैदराबाद संस्थानच्या 'मुक्ती'चा रक्तरंजित लढा झाला. जगातल्या सर्वात श्रीमंत संस्थानिकांपैकी एक असलेला निझाम भारताला शरण कसा आला याची मोठी संघर्षमय कहाणी आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर आजही धगधगत आहे. एवढ्या वर्षांत काश्मिरचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. सुटण्याची चिन्हंही नाहीत. या परिस्थितीत हैदराबादमध्ये वेळीच ती लष्करी कारवाई झाली नसती, आणि निझामाला स्वतंत्र राष्ट्र मिळालं असतं किंवा हैदराबाद पाकिस्तानचा भाग झाला असता तर काय झालं असतं याची कल्पनाही करणं कठीण आहे. सरदार पटेलांनी हैदराबाद मुद्दा म्हणजे भारताच्या पोटातला कॅन्सर असल्याचं म्हटलं होतं. ज्याचं वेळीच ऑपरेशन झालं आणि भारत वाचला. 

हैदराबाद संस्थानात एकूण 16 जिल्हे होते. त्यातल्या मराठी भाषिक 5 जिल्ह्यांना मराठवाडा नाव म्हटलं जायचं. संस्थानचं स्वतःचं सैन्य होतं. रेल्वे होती. स्वतःचं चलन होतं. त्यातली काही नाणी चांदीची होती. स्वतंत्र डाक यंत्रणा होती. संस्थानातल्या 10 जहागिदारांकडून मिळणारं वार्षिक उत्पन्न त्यावेळी 2 कोटींच्या घरात होतं. एवढ्या बलाढ्य संस्थानाला भारतानं झुकवलं. 

15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबादच्या निझामानं भारतात येण्यास नकार दिला. हैदराबादनं मोहम्मद अली जिन्नासोबत बोलणी करून पाकिस्तानात जाण्याची तयारी दाखवली होती. त्याला भारतानं विरोध करताच हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळवण्यासाठी निझामानं प्रयत्न केले. निझामाचे वकिल संयुक्त राष्ट्र संघापर्यंत पोहोचले. भारत आपली भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत आक्रमणकारी देश असल्याचा आरोप निझामानं केला.

कल्पना करा, भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. शेकडो वेगवेगळ्या संस्थानिकांमध्ये, भाषांमध्ये, प्रांतांध्ये विभागलेला भूभाग एक अखंड आणि प्रचंड देश म्हणून उदयाला आला. सगळीकडे स्वातंत्र्याचा आनंद आहे. जनता मोकळ्या हवेत श्वास घेतीय. आणि त्याच वेळी याच देशाच्या मधोमध एक असा प्रांत आहे जो अजूनही पारतंत्र्यात आहे. तिथली जनता रोज मरणयातना भोगत आहे. जेव्हा सगळा देश अभिमानानं तिरंगा फडकवत होता, तेव्हा या भागात तिरंगा हातात घेणं गुन्हा होता. या अत्याचारातून मुक्तता तर दूरच पण त्याहून वाईट म्हणजे इथल्या जनतेला पाकिस्तानात जोडलं जाण्याची भीती निर्माण झाली होती.

हैदराबाद संस्थानानं रझाकार नावाची लष्करी संघटना उभारली होती. तिचा प्रमुख होता कासिम रिझवी. अलिगड मुस्लीम विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर. मूळचा लातूरजवळच्या पाखर सांगवीचा रहिवाशी. भारताच्या मध्यभागी पाकिस्तान तयार करण्याचे रिझवीचे मनसुबे होते. त्याला साथ होती 'मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन'च्या बहादूर यार जंगची. आपला आणि रझाकारांचा काहीही संबंध नाही असं निझाम भारत सरकारला सांगत होता. प्रत्यक्षात, या सगळ्या कार्यक्रमाला निझामाचा पाठिंबा होता. रिझवीच्या रझाकारांना पोसण्याचं काम निझाम करत होता. त्यांच्यासाठीचा खर्च, शस्त्र हे निझामानं पुरवले. लोकांवर अत्याचार करवले. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना चिरडून टाकलं. 

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निझामाचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न रिझवीनं निझामाला दाखवलं होतं. बंगालच्या उपसागराचं पाणी निझामाच्या पायावर आणून घालतो, म्हणजे तो प्रदेशही निझाम संस्थानात आणतो असं रिझवी सांगायचा. या सगळ्यानं निझामाला गुदगुल्या व्हायच्या. याच मंडळींच्या जीवावर निझाम स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची स्वप्न पाहू लागला होता. रिझवीचा झुकाव मात्र पाकिस्तानाकडे होता. निझामानं आपला एजंट लंडनला पाठवून पोर्तुगीज, ऑस्ट्रेलियाकडून जवळपास 25 कोटी रुपयांची शस्त्रं विकत घेतली. पाकिस्ताननंही म्यानमारमार्गेही काही शस्त्रे निझामाच्या सैन्यासाठी पाठवली होती. 

29 नोव्हेंबर 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन यांनी निझाम आणि भारत सरकारमध्ये 'जैसे थे' करार करवला. हैदराबाद संस्थान भारताच्या अधिपत्याखाली पण स्वायत्त देश असेल (Autonomus Dominion nation under India ) अशी तरतूद त्यात होती. याचा फायदा घेत निझामाचं सैन्य आणि विशेषतः रझाकारांनी उन्माद केला. 1945 ते 1948 पर्यंत हैदराबाद संस्थानात अत्याचारानं परिसीमा गाठली होती. खुलेआम कत्तली, अत्याचार, लूट, बलात्कार हे रोजचंच झालं होतं. 

हैदराबाद संस्थानात अत्याचाराचा जोर वाढला आहे म्हणून संस्थान खालसा करावं यासाठी दिल्लीत दबाव वाढत होता. सरदार पटेलही यासाठी अनुकूल होते. त्यांनी अनेकदा लष्करी कारवाईचे संकेतही दिले होते. पण प्रत्यक्ष कारवाईबाबत अजूनही संभ्रम होता. कारण, निझाम आधीच संयुक्त राष्ट्र संघात जाऊन आला होता. भारतानं हैदराबादवर लष्करी बळाचा वापर केला असता तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय झाला असता. आणि पाकिस्तान निझामाच्या मदतीला तत्पर होतं.

11 सप्टेंबर 1948 ला मुहम्मद अली जिनाचा मृत्यू झाला. आणि हीच संधी भारत सरकारनं साधली. तत्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेलांनी हैदराबाद संस्थानवर चाल करण्याचे आदेश दिले. हैदराबादच्या चारही बाजूने सैन्य घुसवण्याचं नियोजन केलं गेलं. आजच्या भाषेत त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो. एक तुकडी औरंगाबाद, एक सोलापूर, एक विजयवाडा आणि एक बीदरमार्गे हैदराबादच्या दिशेनं निघाली. या कारवाईला नाव दिलं गेलं 'ऑपरेशन पोलो'. पुढे हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेल्यानंतर हा आपला अंतर्गत मुद्दा आहे असं सांगत ही लष्करी कारवाई नाही तर 'पोलीस अॅक्शन' होती असं स्पष्टीकरण भारतानं दिलं. 

सोलापूरहून हैदराबादला जाणाऱ्या बटालियनचे नेतृत्व करत होते जे. एन. चौधरी. सोलापूरच्या दयानंद महविद्यालयाच्या मैदानावर भारतीय लष्कराचा कॅम्प लागला होता. 13 सप्टेंबरला सकाळी है सैन्य सोलापूरहून निघालं. ही माहिती रझाकारांना कळाली. वाटेत नळदुर्गच्या पूर्वेला असलेल्या एका पुलावर रझाकारांनी सुरूंग पेरले. हा पूल उडवून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण एका शीख सैनिकानं हा बॉम्ब निकामी केला आणि पूल वाचला. भारतीय सैन्य वायू वेगानं हैदराबादच्या दिशेनं निघालं. जळकोटला वीटभट्टीवर सैन्याचा रझाकारांशी सामना झाला. तिथे रझाकारांना धूळ चारत मजल दरमजल करत सैन्य पुढे उमरगामार्गे हैदराबादेत पोहोचलं.

हैदाराबादच्या फतेह मैदानावर (आताचं लाल बहाद्दुर शास्त्री मैदान) भारतीय सैन्य पोहोचलं. तिकडे निझाम, कासिम रिझवी आणि निझामाचा लष्करप्रमुख जनरल अल इद्रूसची बैठक झाली. भारतीय सैन्य हैदराबादेत आलं तरीही रिझवी मागे हटण्यास तयार नव्हता. बैठकीत त्यानं युद्धाची भाषा केली. निझामानं इद्रूसला विचारलं, आपण भारताचा मुकाबला करू शकतो का? सहाजिकच इद्रूसनं नाही असं उत्तर दिलं. त्यावर चिडलेल्या रिझवीनं निझामासमोरच त्याला सुनावलं, 'इस गधे को यहां से हकाल दो'

जे. एन. चौधरी निझामाच्या भेटीला गेले. तेव्हा रेडिओवरून निझामाची फतेह होत असल्याच्या बातम्या दिल्या जात होत्या. चौधरींनी सांगितलं तुमचे रेडिओ काहीही सांगत असले तरी वास्तव हे आहे की, तुम्हाला चारही बाजूनं भारतीय लष्करानं घेरलं आहे. तुम्हाला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. जीवितहानी टाळण्यासाठी निझामाला रेडिओवरून घोषणा करण्यास सांगितलं गेलं. तेव्हा अटक टाळण्यासाठी निझामानं रेडिओवरून संस्थानातल्या नागरिकांना आणि सैन्याला उद्देशून घोषणा केली, 'मेरी सल्तनत अब खत्म हो चुकी हैं। हथियार डाल दो'

त्यानंतर लष्करी शिष्टाचाराप्रमाणे इद्रूस आणि चौधरींमध्ये फतेह मैदानावर सैन्य शरणागतीची प्रक्रिया पार पडली. चौधरींनी निझामाच्या सैन्याकडून सॅल्यूट स्वीकारला. चौधरींनी खिशातून सिगारेट काढली, ती इद्रूसनं पेटवली. त्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केलं आणि निझाम सैन्याची शरणागती झाली. त्यानंतर भारतीय सैन्य चारही बाजूनं हैदराबादेत आलं आणि शहराचा ताबा घेतला. 

या सगळ्या ऑपरेशनआधी सरदार पटेलांनी एक घोषणा केली होती. जो अधिकारी सर्वात आधी हैदराबादला पोचून निझामाला शरण आणेल, He will be the Political Agent of hydrabad. त्यानुसार सर्वात आधी हैदराबादला पोहोचलेले जे. एन. म्हणजेच जयंत नाथ चौधरी हे बंगाली अधिकारी हैदराबादचे मिलिट्री गव्हर्नर झाले. पुढे ते देशाचे लष्करप्रमुख झाले. त्यांना पद्वविभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. 

हैदराबाद मुक्तीसंग्रमाचा लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्यासारखा नव्हता. तो अधिक गुंतागुंतीचा होता. संस्थानातल्या गावागावात मुक्तीसाठी लढा दिला गेला. प्रत्येक सर्वसामान्य माणसानं रझाकारांचा प्रतिकार केला. त्याबदल्यात अनन्वित अत्याचार सहन केले. प्रसंगी बलिदानही दिलं. पण स्वतंत्र होण्याचं, भारतात येण्याचं स्वप्न पाहणं त्यांनी सोडलं नाही. अतिशय साधी माणसं या लढ्यात प्रचंड बलाढ्य निझामाविरोधात उभी ठाकली होती. रझाकारांनी संस्थानातल्या नागरिकांवर केलेले प्रचंड हिंस्र अत्याचार, कत्तली पाहून महात्मा गांधींनीही सशस्त्र लढ्याला पाठिंबा दिला होता. 

नळदुर्गला आमच्या घरासमोर माकणे कुटुंब राहत होतं. त्या माकणे आजींच्या आईंनी निझामाच्या गाडीवर बॉम्ब टाकला होता. पण तो काही अंतरावर फुटला आणि निझाम बचावला. त्यानंतर त्यांना अटक वगैरे झाली. माझा आणखी एक मित्र होता त्याच्या आजोबांनी अत्याचार करणाऱ्या रझाकारांचा प्रतिकार करत 2 रझाकार ठार केले होते. त्याच्याच आजीनंही लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. मराठवाड्याच्या आणि विशेषतः उस्मानाबाद, लातूर, नांदेडच्या खेड्यापाड्यात अशा कहाण्या आहेत. या स्वातंत्र्यसैनिकांना ना कधी ओळख मिळाली, ना कधी वलय मिळालं. पण अनेक गावांमध्ये उभी असलेली हुतात्मा स्मारकं आजही या बलिदानाची साक्ष देत आहेत. त्यांची आजची अवस्था काय आहे हा भाग वेगळा. 

लहानपणी शाळेला सुट्टी मिळायची म्हणून मुक्तीसंग्राम दिन आवडत होता. नंतर गोष्टी ऐकत गेलो, वाचत गेलो तसं समजलं. मुक्तीसंग्राम दिन हाच खरा आमचा स्वातंत्र्यदिन आहे. शाळा सुटल्यानंतर अणदूरच्या हुतात्मा स्मारकात माझी ट्युशन भरायची. तेव्हा फारसं काही कळायचं नाही. पण आज त्याचं महत्व कळतंय. मुक्तीसंग्रामामुळे वर्षातून चारवेळा तिरंगा फडकवण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. 

यंदा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा झाला. आता हैदराबादच्या, मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होतंय. हैदराबाद संस्थानाला मुक्त करण्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या सर्व ज्ञान-अज्ञान स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन!

मुक्तीसंग्राम दिन चिरायू होवो!

- अजिंक्य गुठे सालेगांवकर

(वेगवेगळे माहिती स्रोत आणि काही लोकांकडून ऐकलेल्या माहितीचं हे संकलन आहे. संदर्भ आणि दुरूस्त्यांचं स्वागत आहे. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...