संघर्षाची धगधगती मशाल जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम कर्णिक काळाच्या पडद्याआड
Updated: November 02, 2022 06:59:54 pm
मंचर, पुणे - जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शाश्वत संस्थेच्या संस्थापक कुसुम कर्णिक (वय-९०) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पुणे येथे सुविधा नर्सिंग केअर सेंटरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वास्तव्य मंचर (ता.आंबेगाव) येथे होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते.
त्यांच्यामागे मुलगा सौरभ आनंद कर्णिक/कपूर व सून कल्याणी सौरभ कर्णिक/कपूर आहेत. ‘शाश्वत’ संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव, खेड तालुक्यात आदिवासी दुर्गम डोंगरी भागात त्या १९८० पासून काम करत होत्या. आदिवासींनी उत्पादित केलेल्या हिरडय़ाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी, स्थानिकांसह आहुप्याची देवराई वाचवण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता.
सरकारच्या रोजगार हमी योजनेत ‘पडकई’चा समाविष्ट करण्यासाठीचे आंदोलन, हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) धरणग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी, आदिवासी, दलित, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध सातत्याने सत्याग्रह, आंदोलनं करणाऱ्या व अन्यायाला वाचा फोडणाऱ्या दुर्गा अशी त्यांची ओळख होती. 'नर्मदा बचाव' आंदोलनात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासमवेत त्यांचा सक्रीय सहभाग होता. आदिवासी मच्छीमार व्यावसायिकांना प्रशिक्षण व रोजगार, प्रौढ साक्षरता वर्ग त्यांनी सुरु केले होते. निवासी शाळा, दहा बालवाड्या व २५ अभ्यास वर्ग त्यांनी सुरु केले आहेत. आदिवासींची ताई या नावाने त्यांना ओळखले जात होते.
‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या संस्थेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अत्यंत बुहमानाचा समजला जाणारा ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह’ हा पुरस्कार २०१२ मध्ये ‘शाश्वत’ संस्थेला मिळाल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे नाव सात समुद्रापार गेले. त्याच बरोबर त्यांना लोकसत्ता वृत्तपत्रांच्या माध्यमातून २०१७ सालचा नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा