परभणीत क्रीडा अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा गुन्हा, १.५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात..
कारवाई आणि पुढील तपास : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Written by : © Ajay Bhujbal
परिवर्तन एक शोध टीम
Published: March 28, 2025 - 15:00 PM (IST)
परभणी, दि. 28: परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau - ACB) मोठी कारवाई करत क्रीडा विभागात कार्यरत दोन अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे (वय ५२) आणि क्रीडा अधिकारी नानकसिंग महासिंग बस्सी (वय ५७) यांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या घटनेने क्रीडा विभागात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण? : तक्रारदार यांच्या क्रीडा अकादमीच्या जागेवर स्विमिंग पूल बांधण्याचे काम सुरू होते. या कामाचे ९०% काम पूर्ण झाले होते. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा आयोजनाचे ५ लाख रुपये आणि स्विमिंग पूल बांधकामाचे ९० लाख रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदार अधिकाऱ्यांना भेटले असता, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी स्वतःसाठी २ लाख रुपये आणि त्यांचे सहकारी क्रीडा अधिकारी बस्सी यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदारांनी या मागणीला नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाने सापळा रचून २७ मार्च २०२५ रोजी कारवाई केली. या कारवाईत नानकसिंग बस्सी यांनी स्वतःसाठी ५० हजार रुपये आणि कविता नावंदे यांच्यासाठी १ लाख रुपये लाच म्हणून स्वीकारताना रंगेहात पकडले.
भ्रष्टाचाराविरोधात विभागाचे आवाहन : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्याकडे भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असेल किंवा कोणी लाच मागत असेल, तर त्यांनी विभागाशी संपर्क साधावा. यासाठी विभागाचे संपर्क क्रमांक आणि पत्ते जाहीर करण्यात आले आहेत, जेणेकरून नागरिक निर्भयपणे तक्रार करू शकतील.
टोल फ्री क्रमांक - 1064
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा